प्रतापगडाजवळ नवीन बांधलेला पाटलांचा जुना वाडा

 प्रतापगडाजवळ नवीन बांधलेला पाटलांचा जुना वाडा





















*प्रतापगडाजवळ नवीन बांधलेला पाटलांचा जुना वाडा*
  २०१२ मधे प्रतापगडाचे माय भवानी संस्थेने हाती घेतलेले काम संपत आले होते.मी त्या कामाचा इंजिनिअर होतो.गडाच्या कामात सतत पुढाकार घेणारे,तिथलेच ग्रामस्थ असलेले चंद्रकांत उर्फ आप्पा उतेकर मला म्हणाले "प्रवीणभाऊ आपल्याला वाडा बांधायचा आहे"
मी म्हणालो "कसला वाडा?"
आप्पा म्हणाले "ते नाही का पूर्वी गावात पाटलांचा वाडा असायचा?तसला."
     मी थोडा दचकलोच,कारण त्यापूर्वी दगडी बांधकामाची कामे इंजिनिअर म्हणून केलेली असल्याने हा किती दमवणारा आणि खार्चिक प्रकार असतो हे मला माहिती होतं.पण आप्पांचा निर्णय ठाम होता.ते गडाजवळ त्यांच्या जागेत एक शिवकालीन खेडेगाव उभारणार होते.त्यात बारा बलुतेदारांचे पुतळे त्यांच्या व्यावसायिक हत्यारांसह असणार होते.यासोबतच मंदिर, पार, आड,वासुदेव, खेळणारी मुले असं सर्व उभारून गाव आकाराला येणार होतं.
  अर्थात पाटलांशिवाय गाव असूच शकत नाही आणि पाटलांच्या वाड्याशिवाय गावाला शोभा नाही, असं हे सरळ गणित होतं.मग सुरु झालं नियोजन.
   ३०×५० फूटात एकचौकी वाडा बांधायचं ठरलं.प्लॅन, इलेवेशन,डिटेलींग झालं.गावोगावी पाडले जात असलेल्या जुन्या वाड्यांचे दगड ,दरवाजे, खिडक्या खरेदी करून वापरायचे,दगड कमी पडले तर घडवायचे ठरलं.अडचण आली ती चौकातील नक्षीदार खांब कमानींची.त्यांचे महागडे दर पाहून मग नवीन तोडगा काढला.
  आमचे मित्र नाना यादव जुन्या वस्तूंचे मोठे संग्राहक शिवाय स्वतः आर्टिस्ट. त्यांच्याकडील जुन्या खांबकमानींचे,ब्रेकेटचे,फायबर मोल्ड काढून,त्या मोल्डच्या पोटात सळ्या घालून,कॉंक्रीट करून खांबकमानींचे स्ट्रक्चर उभे केले.छतासाठी खास ड्रॉइंग करुन फायबर मोल्ड करण्यात आला. काही सागवानी खिडक्या नवीन बनवल्या.तीन वर्षे हे काम चाललं होतं.आप्पांना बांधकामाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे माझं काम बरंचस सोपं झालं.
    इथं महत्त्व होतं ते मूळ अस्सल रुपाला.त्यामुळे कृत्रिम रंग वापरायचे नाहीत असं ठरलं.दगडांचा,लाकडांचा,पितळेचा नैसर्गिक रंग आणि जोडीला शेण,काव(लाल),चुना(पांढरा) इतकेच रंग निश्चित झाले.यामुळेच वाड्याचा जुना फील येणार होता.
  शिवाय अनेक अस्सल जुन्या वस्तू खरेदी करण्यात आल्या. भांडी,पाळणा,नगारा, उखळ-मुसळ,आसूड,लाकडी पेटारे, झोपाळा,इ.अनेक वस्तूंनी वाडा भरायचा होता.
   या वाड्यासाठी वापरलेले दगड सांगलीचा पटवर्धन वाडा,मुधोळचा घोरपडे वाडा,कोल्हापूरचा राजाज्ञे वाडा,इचलकरंजीचा काळे वाडा,अशा अनेक वाड्यांतून आलेला आहे. म्हणजे एका अर्थाने याला ऐतिहासिक वास्तू असे आपण म्हणू शकतो.
    भूमीपूजन होऊन काम चालू झाले. अनेक अडचणी आल्या. कितीदा तरी अडले,अनेक चर्चा झडल्या.काहीवेळा तर गडाचे मोठ्या दगडांचे, चुन्यात चालू असलेले कामदेखील सोपे वाटावे असेही प्रसंग आले.पण अखेर आप्पांच्या जिद्दीमुळे वाडा पूर्ण झाला.
    काही बाबतीत तडजोड करावी लागली, काहीत थोड्या उणीवा राहिल्या, काही बाबी आप्पांच्या व माझ्या मनासारख्या जमल्या नाहीत हे जाणवतंय.पण हे चालायचंच.
    आपण म्हणतो आता पूर्वीसारखे वाडे बांधणं शक्य नाही. पण इंजिनिअर तयारीचा असेल तर तो कितीही जुनी, मोठी आणि सुंदर इमारत आजही हुबेहूब तशीच बांधू शकतो(अपवाद फक्त मूर्तीशिल्पे व मंदिरशिल्पकला).फक्त मालकसुध्दा तेवढ्या तयारीचे पाहिजेत. मग काहीच अशक्य नाही.
   तुम्ही केव्हाही प्रतापगडला गेलात तर हा वाडा तुम्हाला पाहता येईल.वाड्याजवळचं शिवकालीन खेडेगाव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही इतकं देखणं आहे.
    वाड्यात पाटलांचा जो पुतळा आहे तो आप्पांचाच आहे.मी तर मनोमन त्यांना आप्पा पाटीलच मानतो.आणि अशा जिद्दी पाटलांनी मनावर घेतल्यावर असा वाडा उभा होणारच हे काय सांगायला लागतं का ? 
     आणि म्हणूनच तर आपल्याकडे म्हणतात "पाटील हाच गावचा राजा". आणि "पाटलांचा नाद करायचा नसतो".

* मालक - श्री.आप्पा उतेकर. (9822530882)
* स्थळ- हस्तकला केंद्र, प्रतापगड पायथा.
* इंजिनिअर/आर्किटेक्ट- प्रवीण भोसले,सांगली (9422619791)
* फायबर काम - श्री.नाना यादव,सांगली(9923682093)
* पोस्टमधील फोटोखाली माहिती ओळी आहेत.त्या जरूर वाचा.
* खर्च मी कधी आप्पांना विचारलेला नाही. त्यामुळे मला माहिती नाही.
                      प्रवीणभोसले 
           (लेखक-मराठ्यांची धारातीर्थे)

Post a Comment

0 Comments