फाईल हा शब्द आल्याबरोबर आपल्याला काय आठवत असेल, तर ते म्हणजे एखादे कामाचे कार्यालय. एखादा व्यक्ती एखादा अर्ज करतो आणि मग तो अर्ज आल्यापासून एका फाईलची निर्मिती होते. हा अर्ज सर्वप्रथम इनवर्ड म्हणजे कार्यालयाच्या आवक विभागामध्ये नोंदवला जातो आणि तिथून तो रोजच्या टपालामध्ये थेट साहेबांच्या टेबलावर जातो.
साहेब जसा वेळ मिळेल तसे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये त्या आलेल्या अर्जावर एक शेरा मारतात आणि तो अर्ज पुन्हा खाली येतो. कनिष्ठ लिपिक महोदय शेर्याप्रमाणे त्यावर कार्यवाही करण्यास सुरुवात करतात आणि इथे फाईलची निर्मिती होते. कनिष्ठ महोदय स्वतःची टिप्पणी लिहून ती फाईल वरच्या साहेबांकडे म्हणजेच ज्येष्ठ लिपिक यांच्याकडे देतात. सादर केलेला प्रस्ताव वरिष्ठ लिपिक आपल्याकडे ठेवून घेतात आणि पुढे त्यांना वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यावर आपला शेरा मारून ती फाईल वर पाठवून देतात.
तुम्हाला असे वाटेल की, ही वर आलेली फाईल थेट मोठ्या साहेबांकडे जात असेल. नव्हे, नव्हे.. तसे होत नसते. ती फाईल कार्यालयाच्या अधीक्षक महोदयांकडे जाते. अधीक्षक महोदय त्या फाईलचा अभ्यास करतात. एव्हाना त्या फाईलमध्ये 10-12 कागद लागलेले असतात. अधीक्षक महोदयांचा अभ्यास किती काळ चालेल, हे काही सांगता येत नाही. जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे अधीक्षक महोदय त्या फाईलवर शेरा मारतात आणि खपटाला लाल फीत गुंडाळलेली ती फाईल त्यानंतर साहेबांच्या टेबलवर जाते. झटकापटकी ते कोणत्याही फाईलवर सही करत नाहीत. कारण, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला, तर त्यांच्या नावाने ओरड होत असते आणि क्वचित प्रसंगी निलंबनाला सामोरे जावे लागत असते. साहेबांच्या रिटायरमेंटला जेमतेम चार-सहा महिने राहिले असतील, तर ते साहेब सगळे निर्णय आपल्या रिटायरमेंटपर्यंत तसेच प्रलंबित ठेवून अपूर्ण फायली टाकून निवृत्त होऊन आपल्या घरी निघून जातात. शेवटी प्रत्येकाला जीव प्यारा असतो. समजा साहेबांना एखाद्या फाईलवर निर्णय घ्यायचा नसेल, तर ते त्यावर 'प्लीज डिस्कस' म्हणजेच 'चर्चा करा' असा शेरा मारतात.
हाच शेरा अधीक्षक महोदय वरिष्ठ लिपिकांना आणि वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकांना मारून ती फाईल परत पाठवतात. एकदा तळागाळाला गेलेली फाईल पुन्हा वर येणे अत्यंत कठीण असते. ज्या व्यक्तीने हा अर्ज केला आहे, तो व्यक्ती दरम्यान महिनाभर झाल्यामुळे कंटाळलेला असतो आणि सारखा त्या कार्यालयात चकरा मारत असतो. ती फाईल पुन्हा 'जागृत' करण्यासाठी त्याला बरीच खटपट करावे लागते.
0 Comments