लोखंडापेक्षा जास्त आयुष्य असणाऱ्या फायबरच्या सळ्या अन् स्वस्तही...; पण तुम्ही घर बांधू शकत नाही...
घर किंवा कोणत्याही इमारतीचे बांधकाम करायचे म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी लोखंडी सळ्या येतात. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात लोखंडी सळ्यांना एक उत्तम आणि मजबूत पर्याय मिळाला आहे.
सध्या अनेक बांधकामांमध्ये 'फायबर सळ्या' म्हणजेच प्लास्टिकच्या सळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या या सळ्या लोखंडापेक्षा जास्त मजबूत असू शकतात का? त्या किती किफायतशीर आहेत आणि त्यांच्या किंमतीत काय फरक आहे? याबद्दलची रंजक माहिती समोर आली आहे.
काय आहे 'प्लास्टिक सळ्या'?
या प्लास्टिकच्या सळ्यांनाना तांत्रिक भाषेत GFRP (Glass Fiber Reinforced Polymer) सळ्या म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, हा सळ्या काचेचे तंतू (ग्लास फायबर) आणि रेझिन यांच्या अतिशय मजबूत मिश्रणापासून तयार केला जातो. या सळ्यांची ग्रीप आणि सिमेंटवरील पकड लोखंडाप्रमाणेच अत्यंत घट्ट असते. यामुळेच आजकाल पूल, नाले, हायवे डिव्हायडर्स आणि पायाभूत सुविधांच्या बांधकामात याचा वापर वेगाने वाढला आहे.
फायबर सळ्यांचे 'हे' आहेत ५ मोठे फायदे:
गंज लागत नाही: लोखंडाला दमट हवामान किंवा पाण्याचा संपर्क आल्यास गंज लागतो, ज्यामुळे बांधकाम कमकुवत होते. मात्र, फायबर सळ्यांवर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही, त्यांना कधीही गंज लागत नाही.
स्टीलपेक्षा दुप्पट मजबूत: या सळ्या वजनाने अत्यंत हलक्या असल्या, तरी त्यांची ताकद आणि मजबूती सर्वसामान्य स्टीलच्या सळ्यांपेक्षा दुप्पट मानली जाते.
८० ते १०० वर्षांचे आयुष्य: लोखंडाच्या तुलनेत फायबर सळ्या कमालीच्या टिकाऊ असतात. ओलावा किंवा दमट वातावरणातही या सळ्या ८० ते १०० वर्षे अगदी सहज टिकतात.
वाहतुकीसाठी सोप्या: वजनाने हलक्या असल्यामुळे या सळ्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे आणि मजल्यावर चढवणे अत्यंत सोपे आणि कमी खर्चाचे होते.
शॉर्ट सर्किटचा धोका नाही: या सळ्या वीजरोधक असतात, त्यामुळे इमारतीमध्ये करंट किंवा शॉक लागण्याचा कोणताही धोका नसतो.
एक मोठी मर्यादा!
या फायबर सळ्यांचा एक मोठा उणेपणा किंवा मर्यादा म्हणजे या सळ्या लोखंडासारख्या वाकवता येत नाहीत. म्हणूनच त्यांचा वापर फक्त सरळ किंवा उभ्या बांधकामांमध्येच केला जाऊ शकतो, जेथे सळ्या वाकवण्याची गरज नसते.
किंमतीतील फरक: महाग की स्वस्त?
जर आपण वजनाच्या (प्रति टन) हिशोबाने तुलना केली, तर फायबर सळ्या लोखंडापेक्षा महाग असू शकतात. उदाहरणार्थ, जर लोखंडी टीएमटी सळ्या ४० हजार रुपये प्रति टन मिळत असतील, तर फायबर सळ्यांची किंमत सुमारे १ लाख रुपये प्रति टन असू शकते. परंतू, या सळ्यांचे आयुष्य जास्त आणि वजन लोखंडापेक्षा खूपच कमी असते. त्यामुळे १ टन वजनामध्ये लोखंडाच्या जितक्या सळ्या येतात, त्याच्या दुप्पट किंवा त्याहून अधिक सळ्या फायबरच्या १ टनामध्ये येतात.

0 Comments